इस्लामाबाद - पाकिस्तानात सीडीएफ बनताच फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी पहिल्याच भाषणात भारताविरोधात गरळ ओकली आहे. भविष्यात कुठल्याही हल्ल्याला पाकिस्तान तितक्याच आक्रमक आणि तीव्र उत्तर देईल असं विधान मुनीर यांनी करत भारताला पोकळ धमकी दिली. भारताने कुठल्याही भ्रमात राहू नये असं त्यांनी म्हटलं. मुनीर यांना अलीकडेच ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याच्या फिल्ड मार्शलवरून आता संरक्षण दल प्रमुख या नवीन पदावर नियुक्ती मिळाली आहे. पाकिस्तानात घटना दुरुस्ती करून हे पद निर्माण करण्यात आले त्यामुळे मुनीर यांना अधिक पॉवर मिळाली आहे.
सैन्याला संबोधित करताना असीम मुनीर म्हणाले की, कुणालाही पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला आव्हान देण्याची परवानगी नाही. पाकिस्तानची ओळख अजिंक्य आहे. पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे पण राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही. वाढत्या आणि बदलत्या धोक्यांना लक्षात घेता तिन्ही सैन्यांनी एकात्मिक प्रणाली अंतर्गत बहु-डोमेन ऑपरेशन्स आणखी वाढवणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितले. पाकिस्तानात जनरल हेडक्वार्टर्समध्ये ते भाषण करत होते.
तालिबानला धमकी, २ पर्याय दिले...
अफगाणिस्तानने एकतर पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवावेत किंवा तहरीक ए तालिबान पाकिस्तानची उघड आणि छुपी मदत करत राहावे असं २ पर्याय देत असीम मुनीर यांनी तालिबानला धमकी दिली आहे. मुनीर यांचे विधान अशावेळी आलं आहे जेव्हा या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. इस्लामिक अमीरात सातत्याने पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा असून अफगाणिस्तानला पाकिस्तानच्या सुरक्षेची जबाबदारी दिली जाऊ शकत नाही असं म्हणत आहे तर दुसरीकडे पाकिस्तान त्यांचं अपयश झाकण्यासाठी अफगाणिस्तानवर आरोप करतेय असं तालिबानचे म्हणणं आहे. मागील काही दिवसांपासून तुर्की येथे या दोन्ही देशांमध्ये चर्चेसाठी बैठका होत आहेत.
काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्या हल्ल्यात २६ पर्यटक मारले गेले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला. भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद्यांना टार्गेट करून हल्ले केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सैन्य संघर्ष झाला. भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील दहशतवाद्यांना ठार केले होते. ४ दिवसांच्या सैन्य संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धविराम झाला. मात्र अजूनही पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत.